मुंबई: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी आमदार आणि अनेक पदाधिकारी पक्ष सोडून जात असल्याच्या चर्चा सुरू असताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आता अॅक्शन मोडमध्ये येत पक्षबांधणीसाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. उद्धव ठाकरे हे पक्षाच्या खासदार आणि आमदारांशी स्वतंत्रपणे चर्चा करणार असल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेना भवनात येत्या 20 फेब्रुवारी रोजी खासदारांची तर 25 फेब्रुवारी रोजी आमदारांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
शनिवारी मातोश्रीवर झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाच्या नेत्यांसोबत चर्चा केली. या चर्चेदरम्यान त्यांनी खासदार आणि आमदारांशी स्वतंत्र बैठक घेण्याचा निर्णय घेतला. या बैठकीत निवडणुकीपूर्वी सरकारने जाहीर केलेल्या विविध योजना बंद करण्याचा मुद्दा उपस्थित करण्यात येणार आहे. तसेच, राज्य सरकारकडे प्रलंबित असलेल्या महापालिकेच्या निधी आणि मोडलेल्या ठेवी यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर ठाकरे सरकारला घेरण्याची रणनीती आखण्याची शक्यता आहे.
आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन ३ मार्चपासून सुरू होत असल्याने उद्धव ठाकरे आमदारांच्या बैठकीत या अधिवेशनासाठीची रणनीती ठरवणार आहेत. आमदारांच्या मतदारसंघांतील परिस्थितीचा आढावा घेत त्यावर पुढील कृती ठरवली जाणार आहे. शिवसेनेत सध्या होत असलेल्या उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
दरम्यान, कोकणातील कुडाळ १ मतदारसंघाचे उद्धवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. विधानसभेतील पराभवानंतर ते पहिल्यांदाच ठाकरे यांच्या भेटीस आले होते. या भेटीत नाईक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, “एसीबीच्या माध्यमातून मला त्रास दिला जात आहे. मात्र, ठाकरे यांची साथ कधीच सोडणार नाही. जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सोबत घेऊन नव्याने बांधणी करण्यावर भर देऊ.”
उद्धव ठाकरे यांच्या या बैठकीमुळे पक्षात नवचैतन्य निर्माण होण्याची अपेक्षा आहे. शिवसेना भवनात होणाऱ्या या बैठकीत आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत. विशेषतः महापालिकेचा निधी, बंद करण्यात आलेल्या योजना आणि सरकारविरोधातील आक्रमक भूमिका यावर या बैठकीत चर्चा होईल. शिवसेनेतून होत असलेल्या गळतीला रोखण्यासाठी उद्धव ठाकरे काय रणनीती आखतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.